अल्लडपणाचे वय ते
कोण-कोणाचे ठाऊक नसायचे
संध्याकाळ झाली तरी
इथे-तिथे उनाडत बसायचे

आईला भारी काळजी असायची
घरी सातच्या आतची ताकीद असायची
मी मात्र तिच्या बोलण्याकडे
अजिबात लक्ष देत नसायची

एके दिवशी काही
असे वेगळेच घडले
पोट आणि कंबरेचे ते
दुखणे सुरु झाले

अजाणत्या त्या वयात
ती माझ्या आयुष्यात आली
थाट तिचा असा कि तिने
एका रात्रीत बाई बनवली

कोवळ्या माझ्या मनाला
हलक्या यातना देऊन गेली
येणार आता मी दर महिन्याला
हळूच कानात सांगून गेली

आईच्या चिंतेच भय
आज मला कळाले
का करायची ती काळजी
उत्तर आज मला मिळाले

आता तर ती दर महिन्याला येते
येण्याआधी हलकीशी चाहूल देते
तिच्या येण्याचे नकोसे ते दुखणे
चार-पाच दिवसापर्यंत अविरत राहणे

आल्यावर ती उभी अचानक
मज देवाची दारे बंद होतात
का कोण जाणे-येणे तिचे
लोक इतके का पूजतात ?

एके दिवशी तिच्याविषयीचा
मनी आदर निर्माण झाला
"आई" होण्याचे सुख पुरवणारी
हिचीच ती एकमेव आशा

ती आता अशीच
चाळीशी पर्यंत येत राहणार
हलक्या-फुलक्या अधून-मधून
यातना देत राहणार

ती खूप सुंदर आहे
मज अभिमान आहे तिचा
आव्हान असे सर्वांना
करावा आदर त्या "पाळीचा"
Image Credit  
unsplash-logoBen White