आई-बाबांची धास्ती वाढते
मुलगी विशी ओलांडते जेव्हा
कळूनी येते रीत जगाची
झिजवावे लगती रोज उंबरठे जेव्हा
कारण एकही चूक करायची नसते लग्न मुलीचे असते तेव्हा

उमजती ते दर आभूषणाचे
आयुष्याची पुंजी मोडतात जेव्हा
पारख होई शुभ्र वस्त्रांचीही
चोचले सर्वांचे पुरवायचे असतात जेव्हा
कारण एकही चूक करायची नसते लग्न मुलीचे असते तेव्हा

चार-पाच महिन्याआधीच जय्यत
तयारी सुरु करायची असते जेव्हा
एक एक आणा सुद्धा
महत्वाचा वाटायला लागतो जेव्हा
कारण एकही चूक करायची नसते लग्न मुलीचे असते तेव्हा

घरची मंडळी पुरती लक्ष सर्वत्र
मुलांकडची माणसे येती जेव्हा
सभा मंडपात आणि जेवणाच्या पंगतीला
काटेकोर पणे लक्ष ठेवायचे असते जेव्हा
कारण एकही चूक करायची नसते लग्न मुलीचे असते तेव्हा

काही कमी पडू द्यायचे नाही
मुलीचा बाप सांगतो जेव्हा
बापसुद्धा हतबल होई
जावयाची पायधुणी करतो जेव्हा
कारण एकही चूक करायची नसते लग्न मुलीचे असते तेव्हा

हमसून हमसून रडती सारे
मुलीची पाठवणी असते जेव्हा
बापसुद्धा आनंदाने रडतो
लोकांचे उसने देतो तेव्हा
कारण एकही चूक करायची नसते लग्न मुलीचे असते तेव्हा

नुकतेच लग्न लावून देवोनी
जबाबदारी संपत नसते जेव्हा
खरी काळजी लग्नानंतरच
आई-बाबांना सतावते जेव्हा
कारण एकही चूक करायची नसते लग्न मुलीचे असते तेव्हा

Image Credit 
unsplash-logoAyyappa Giri